पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते असे का म्हणाल्या चित्राताई ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – आज चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवून बेहिशेबी संपत्ती जमावल्याचा आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. यावरून चित्रा वाघ खूप आक्रमक झाल्या होत्या. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत “लाचलुचपच प्रतिबंधक विभाग माझ्या नवऱ्याचा छळ करत असल्याचा आरोप करतानाच मीच तुम्हाला पुरून उरेन” असे आव्हान देत सरकारवर टीका केली आहे.

ईदीच्या दिवशी शरद पवार यांनी मला बोलावलं..
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ”पवार साहेब मला आज सकाळपासून तुमची खूप आठवण येते’, असे म्हणत आपले पती किशोर वाघ हे निर्दोष असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. ५ जुलै २०१७ ला माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाला आणि ईदीच्या दिवशी ७ जुलैला शरद पवार यांनी बोलावलं. माझ्याकडे पंचनाम्याची, एफआयआरची कॉपी मागितली. ती पाहिली आणि त्यांनी सांगितले की, चित्रा, तुझा नवरा यात कुठेच नाही, ” असे स्वतः शरद पवार यांनी मला सांगितले असे चित्रा वाघ यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

माझ्या नवऱ्याने एक रुपयासुद्धा घेतलेला नाही
नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ‘ते प्रकरण अजूनही कोर्टात सुरू आहे. मला महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगायचे आहे की, माझ्या नवऱ्याने एक रुपयाही घेतलेला नाही. तो त्या ठिकाणी नव्हताच. कृपया माझ्या नवऱ्याला कळू द्या की माझ्या नवऱ्याने पैसे घेतले की नाहीत’,असे बोलत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

चित्रा वाघ यांचा गृहमंत्री अनिल देशमुखांना टोला
हे सरकार आता आले आहे. अजूनही २०११ पासूनच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कितीतरी प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच अजूनही कोणावर केस दाखल झाली नाही हे मी जबाबदारीने सांगत आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला गांधी हॉस्पिटलचा सुपरिटेंडेंट डॉ. गजानन भगत याची अजून चौकशीच सुरू आहे आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करत आहेत, वा रे वा… वा गृहमंत्री, तुम्हाला तर तिनदा सॅल्युट… असे म्हणत चित्रा वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना टोला लगावला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सध्या चांगलेच अडचणीत आले आहे. परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात किशोर वाघ हे वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. तेव्हा किशोर वाघ यांना ५ जुलै २०१६ रोजी एका प्रकरणात ४ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या लाच प्रकरणाच्या संबंधित १ डिसेंबर २००६ ते ५ जुलै २०१६ या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची चौकशी सुद्धा करण्यात आली होती. या चौकशीमध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक, वारसाहक्काची मालमत्ता, खर्च ईत्यादी बाबींचा सविस्तर तपास करण्यात आला होता. या तपासामध्ये किशोर वाघ यांच्याकडे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त बेकायदेशीर मालमत्ता आढळून आली होती. किशोर वाघ यांच्याकडे असणार हि बेकायदेशीर मालमत्ता त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे ९० टक्के इतकी होती. या चौकशीच्या अहवालानुसार दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये १३(२) आणि १३(१ )E या कलमांतर्गत १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.