ड्रग माफीयांची माहिती न देताच ‘ड्रामा क्वीन’ का परत गेली ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात माहिती असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा एका नटीने केली. मुंबईत येऊन नटीने तमाशाही केला, परंतु ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच परत का गेली, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

बॉलिवूडचे ड्रग माफीया कनेक्शनबाबत गुन्ह्यांची माहिती तिच्याकडे आहे असे कंगनाने सांगितले होते. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबी याप्रकरणी चौकशी करत होती, त्यांच्याकडे कंगनाने ड्रग संदर्भातील माहिती देणे उचित होते परंतु या नटीने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली. मुंबई पोलीस याचा त्यावेळी तपास करत नव्हते. कंगनाकडे बॉलिवूड व ड्रग कनेक्शनची जी माहिती आहे ती तीने एनसीबीकडे द्यावी अशी आम्ही मागणीही केली होती.

पण मुंबईत काही दिवस राहून कंगनाने ही माहिती दिली नाही हे आश्चर्यकारक असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे .एखाद्या गुन्ह्याची माहिती दडवणे हे गुन्हा ठरते. नागरिक कर्तव्याचे ते हनन ठरते याची कंगनाला माहिती असावी. तरीही ती माहिती न देता हिमाचल प्रदेशकडे परत गेली. यातून कंगना फक्त नौटंकी करण्यात माहिर असून तेवढ्यासाठी मुंबईत येऊन तमाशा करुन परत गेली असे म्हणण्यास वाव आहे, असे सावंत म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like