चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांच्या वक्तव्यावर पलटवार, म्हणाले – ‘हा मनात मांडे खाण्याचा प्रकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले काही आमदार आणि नेते हे राष्ट्रवादीमध्ये लवकरच दाखल होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. यानंतर भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र, हा मनात मांडे खाण्याचा प्रकार असल्याचे म्हणत पलटवार केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी त्यांनी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत, असं ठामपणे सांगितले. भाजप आमदार इतर पक्षाच्या संपर्कात असल्याचे सांगणे म्हणजे मनात मांडे खाण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीतील आमदार फुटू नये म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे अजित पवार यांना भेटले होते. तसंच कराडमध्येही शरद पवार यांनी बोलावलेल्या कोरोना आढावा बैठकीला हजर होते. शिवेंद्रराजेंच्या या भेटीमुळे साताऱ्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते. शिवेंद्रराजे भोसले आणि शरद पवार यांच्या भेटीवर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. शिवेंद्रराजे हे शरद पवार यांना भेटले यात गैर काय आहे ? शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे कामासाठी कुणीही भेटू शकतो, मी ही भेट घेत असतो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच राज्यातील सरकार पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही सरकार वैगेरे अस्थिर करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही, असेही पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये पुन्हा परतण्यास उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असून हा निर्णय सार्वजनिक जाहीर केला जाईल, असेही मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like