नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांसाठी सत्तेचा ‘महामार्ग’ का उभारला नाही ?

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी म्हटले होते की, ‘राजकारण आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं’, या त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती. परंतु शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता आपल्या हातात घेतली आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी बाकावर बसवलं.

दरम्यान नितीन गडकरी यांनी भाजपा-शिवसेनेत मैत्रीचा पूल का बांधला नाही, भाजपासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सत्तेचा महामार्ग का बनवला नाही, असे प्रश्नही अनेकांच्या मनात आहेत. त्यांचं उत्तर नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत दिलं आहे. गडकरी उत्तर देताना गमतीनं म्हणाले की, ‘माझ्या खात्याचा रस्ते सुरक्षा कायदा तिथे लागू नव्हता. म्हणजेच, त्या विषयाची जबाबदारी माझ्याकडे नव्हती. देवेंद्र फडणवीस सक्षम होते. ते प्रयत्न करत होते.

त्यांना मदत लागेल तेव्हा आम्ही बोलत होतो. परंतु, मी काही करायचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी नेमकं काय झालं हे देवेंद्र फडणवीस किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहाच सांगू शकतील’ असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तुम्ही रस्ता बांधणार नाही का, असं विचारताच, रस्त्याच्या कामासाठी आधी टेंडर निघतं, मग कॉन्ट्रॅक्ट मिळतं आणि नंतर वर्क ऑर्डर निघते, असं ते हसत हसत म्हणाले.

महाराष्ट्रात सत्तापेच निर्माण झाला तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी नितीन गडकरींच्या नावाची चर्चा झाली होती. आणि यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना यांनीही होकार दिला होता. त्याबाबत विचारताच या सगळ्या विधानांना गडकरींनी खोडून काढले. ते म्हणाले, ‘मी राजकारणी नाही. मी डिप्लोमसी करत नाही. जे बोलतो ते मी करतो. काही वर्षांपूर्वी मला दिल्लीत यायची इच्छा नव्हती. पण, भाजपाध्यक्ष म्हणून मी दिल्लीत आलो आणि आता मला दिल्ली सोडायची नाही. मलाही जायचं नाही आणि मला कुणी पाठवतही नाही.’ असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या या चर्चांवर पडदा टाकला होता.

तसेच मला जे काम मिळाले आहे, ज्या कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. त्या कामाशी मी बांधील आहे आणि राजकारणापेक्षा काही टार्गेट मी निश्चित केली आहेत, ती मला पाच वर्षात पूर्ण करायची आहेत, असं गडकरी म्हणाले. नमामि गंगे, बद्रीनाथ-केदारनाथ आणि मानसरोवरला जाणं सुकर करणारा मार्ग, मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे हे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धारच त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, असदुद्दीन ओवैसी या सगळ्यांना विकासकामांमध्ये सर्वतोपरी मदत केल्याचं स्पष्ट करत विकासाच्या कामात मला राजकारण आवडत नाही असे त्यांनी सांगितले.

तसेच गडकरींना नवे सरकार किती काळ टिकणार याबाबत विचारले असता त्यांनी ‘जे कधी एकमेकांना भेटत नसत, एकमेकांकडे पाहून हसत नसत, ते संधीसाधू राजकारणासाठी एकत्र आले आहेत’ असे बोलत महाविकास आघाडीला चिमटा काढला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/