मला नाव ठेवणाऱ्यांनी स्वतःच्या कारखान्यांची बिले का दिली नाहीत ?

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – आपला साखर कारखाना अडचणीत असताना नावे ठेवली. अडचणीत मार्ग काढून देणी दिली. राहिलेलीही लवकरच देणार आहे. पण आम्हाला नावे ठेवणाऱ्यांनी स्वत:च्या कारखान्याची बिले का दिली नाहीत. दोन्ही सहकारी कारखाने अडचणीत आहेत, तरी दुसऱ्याकडे बोट दाखवतात, असा आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केला.

श्रीगोंदा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पाचपुते म्हणाले की, घोड व कुकडीच्या पाण्याचे नियोजन करण्यात मात्र तालुक्याचे युवा आमदार नापास झाले. तालुक्यात सत्ता नसताना रस्ते, पाणी, विजेच्या समस्या सोडवण्याचे काम आम्ही केले.माळढोक पक्षी अभयारण्याचे आरक्षण उठवले. घोड कालवा कोणी फोडला, रोटेशन मिळाले नाही म्हणून मानवनिर्मित दुष्काळ करुन या भागातील सव्वालाख टन ऊस चारा म्हणून तोडला गेला.

माझ्यावर जनतेचे उपकार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी तालुक्यात विकासपर्व घेऊन यायचे आहे. तालुक्याचे गेलेले वैभव पुन्हा येण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे, यश नक्कीच मिळेल.मोदी सरकारने जनतेच्या हिताची कामे केल्याने लोकसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा त्यांना सत्ता दिली. यापुढेही देत राहतील, असा विश्वासही पाचपुते यांनी व्यक्त केला.