मुंबई हायकोर्टानं परमबीर यांना फटकारले, म्हणाले – ‘गुन्ह्याबद्दल माहीत असूनही तुम्ही FIR का नोंदवला नाही?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर तातडीन सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर हायकोर्टाने आज (बुधवार) त्यांना चांगलेच फटकारले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची आणि त्यांच्या कारभाराची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी परमबीर यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर हायकोर्टात सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान परमबीर सिंह यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना गप्प का बसलात ? एफआयआर नोंदवणे आपले कर्तव्य होते. परंतु आपण तसं केलं नाही. एखाद्या सामान्य माणसालाही एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळाल्यास एफआयआर दाखल करणे अपेक्षित असते, परंतु पोलीस अधिकारी असून सुद्धा आपण गुन्हा नोंदवला नाही, हे आपले अपयश आहे, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना खडेबोल सुनावले आहेत.

काय आहे प्रकरण ?
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 20 मार्च 2021 रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला दर महिन्याला मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा गौप्यस्फोट केला. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला आपल्या निवासस्थानी बोलावून वसुली करण्यास सांगितले होते, असाही आरोप परमबीर यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले ?
हाय कोर्टात जाण्यापूर्वी परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना फटकारले. आधी हाय कोर्टात जाण्याचा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला. परमबीर सिंह यांचे आरोप हे गंभीर आहेत, पण हायकोर्टात याबद्दल याचिका दाखल का केली नाही ? हायकोर्टाला चौकशी समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हायकोर्टात याचिका दाखल करा, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना केली होती.