राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंचं पाणीकपातीवरून मोठं विधान, म्हणाले…

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याप्रकरणी शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला आहे. त्यांनी सांगितले पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे यामागे कोणते कारण आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनात काय चुका केल्या आहेत, काय अडचणी आहेत आदींबाबत पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही शहराला दररोज पाणीपुरवठा केला जात होता. तसेच त्यांनी प्रश्न उपस्थित केला की पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना पाणीकपात का होत आहे.

निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राला खासदार डॉ. कोल्हे यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने आदी उपस्थित होते.

अमोल कोल्हे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी पावसाच्या अभावामुळे धरणाच्या पाण्याची पातळी देखील खालावलेल्या अवस्थेत होती. तरीही योग्य नियोजनामुळे शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामानाने यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे पाणी कपात न करता शहराला नियमितपणे दररोज पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, हे कसले नियोजन आहे, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

तसेच यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीवर लक्ष केंद्रित करत अर्धवट राहिलेल्या कामांकडे बोट दाखवले. ऑप्टीकल फायबर लेईंगचे काम झाले आहे. मात्र, कव्हरिगंसाठी अनेक ठिकाणी फक्त मुरूम वापरला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीची कामे नक्की स्मार्टली होत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/