… म्हणून आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन दिला : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रायगड पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीचे ( Republic TV) संपादक अर्णब गोस्वामींना ( Arnab Goswami) अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक ( Anvay Naik) यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच अर्णब यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. यावर उच्च न्यायालयाकडून जामीन ( bail) अर्ज फेटाळून खालच्या न्यायालयात जाण्यासाठी सांगितले होते. यानंतर अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सर्वोच्च न्यायालयाकडून

(Suprem Court) जामीन मंजूर करण्यात आला. आज न्यायालयाकडून याचे कारण देण्यात आले. अर्णब गोस्वामींना अटक होताच महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले होते. ११ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालायाने गोस्वामींना जामीन मंजूर केला होता, तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयालाही फटकारण्यात आले. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारले जाण्याच्या प्रकरणांत उच्च न्यायालयांची कामगिरी समाधानकारक नाही, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीकालीन खंडपीठापुढे अर्णब गोस्वामी व अन्य आरोपींच्या जामीन याचिकेची सुनावणी करण्यात आली होती. त्यावेळी अर्णब गोस्वामी, नितीश सारडा, परवीन राजेश सिंह या तिघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम जमीन मंजूर करण्यात आला. सुनावणीदरम्यान, न्या. धनंजय चंद्रचूड म्हणाले की, जर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट करण्याच्या दिशेनेच एकूण वाटचाल सुरू होती. जर तुम्हाला एखादी वाहिनी आवडत नसेल तर नका पाहू, जर राज्य सरकारकडून एखाद्या व्यक्तीला लक्ष्य केले जात असेल तर त्या सरकारला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे हे लक्षात घ्या, अशीही तंबी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. अंतरिम जामीन का दिला याचे कारण आज सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब गोस्वामींवर दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रथम दर्शनी मूल्यमापनात गोस्वामींविरोधात गुन्हा केल्याचे सिद्ध होत नाही, यामुळे अंतरिम जामीन दिल्याचे कारण न्यायालयाकडून देण्यात आले आहे.

अर्णब यांची सुटका आणि घोषणाबाजी
अर्णब गोस्वामी रात्री ८.१५ वाजता तळोजा कारागृहातून बाहेर पडले तेव्हा गोस्वामी यांनी बाहेर पडताच गाडीतूनच ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. अर्णब यांच्या समर्थकांकडून कारागृह परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. ‘अर्णब जिंदाबाद’, ‘भारतमाता की जय’ यांसारख्या घोषणा सुरू करण्यात आल्या होत्या. कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांकडून ‘हॅपी दिवाली अर्णब’ – ‘सत्यमेव जयते’ अशा आशयाच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे मोबाईलची टॉर्च लावून स्वागत करण्यात आले.