#Loksabha : राष्ट्रवादीने चौथ्या खासदारालाच का डावलले ?

विजयसिंह मोहिते पाटील समर्थकांचा सवाल, माढ्याचा तिढा सुटणार कधी

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीने राज्यातील विद्यमान चारपैकी तीन खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, माढा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव जाहीर न केल्याने माढाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक संतप्त झाले असून पक्षातून मोहिते पाटील यांची जाणीवपूर्वक कुचंबणा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संतप्त सवाल केला जात आहे. दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर माढ्यात नगरची पूर्नरावृत्ती होईल की काय अशी भिती राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे.

२०१४ मध्ये राष्ट्रवादीचे केवळ ४ खासदार निवडून आले होते. मोदी लाट असताना विजयसिंह मोहिते पाटील माढामधून विजयी झाले होते. २०१४ मध्ये निवडून आलेले सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले आणि धनंजय महाडिक यांची उमेदवारी राष्ट्रवादीने जाहीर केली मात्र, माढ्यातून कोण उमेदवार राहणार हे अद्याप जाहीर केले नाही.

माढ्यातून विजयसिंह की रणजितसिंह या पैकी कोणाची निवड करायची असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसपुढे पडला आहे. त्यात माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. संजय शिंदे यांनी प्रथम शरद पवार यांची भेट घेतली नंतर मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून त्यांना जाऊन भेटले.

एकूणच माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा तिढा वाढल्याचे पाहावयास मिळाले आहे. या सर्व घडामोडींनंतर विजयसिंह मोहिते पाटील हे पुत्र माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. कोणत्याही परिस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही तर भाजपातून निवडणूक लढावावी यासाठी कार्यकर्त्यांमधून दबाव वाढत आहे.