रविवार विशेष : भाजपाचा शिवसेनेला ‘इतका’ विरोध का ?

पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशात भाजपाने मायावती यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देऊ केले. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासाठी लोकसभेला त्यांना आपल्या ७ जागा दिल्या. जम्मू काश्मीरमध्ये कट्टर विरोधक असलेल्या महेबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. आता हरियाणात दुष्यंतसिंह याचे १० आमदार असताना त्यांना ११ मंत्रीपदे दिली, देशभरात भाजप सर्वत्र तडजोड करत असताना गेल्या ३० वर्षापासून मित्र असलेल्या शिवसेनेबाबत भाजप इतका ताठर का ?. बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेनुसार मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप का विरोध करत आहे. त्यासाठी महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य का सोडून देत आहे?. असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. त्यासाठी शिवसेना हा पक्ष आणि त्याचे वैशिष्ट्य याचा विचार केल्यावरच त्याचे उत्तर मिळू शकते.

शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसबरोबर महाशिवआघाडी स्थापन करीत असला तरी ते आपली हिंदुत्वाची भूमिका नक्कीच सोडणार नाही. भाजपापेक्षा शिवसेनेचे हिंदुत्व अधिक कडवे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक संस्थांमधील कार्यकर्ते हे विशेषत: विश्व हिंदु परिषद, बजरंग दल अशा संघटनांमधील कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाचे आकर्षण आहे. देशभरात भाजपाच्या हिंदुत्ववादी मतात वाटेकरी होऊ शकणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेची भाजपाला नेहमीच भिती वाटत राहते.

मुंबई महापालिकेच्या जोरावर शिवसेना राज्यभर पसरली. तिने उत्तर प्रदेश, दिल्लीतही काही वर्षांपूर्वी पाय पसरण्याचा प्रयत्न केला होता. पण, तेथे संघटनेचा विस्तार करण्यासाठी राज्यातील नेत्यांना हिंदी पट्ट्यातील राज्यात पुरेसा वेळ देऊ न शकल्याने व त्यासाठीची आवश्यक आर्थिक रसद पुरविणे शक्य न झाल्याने शिवसेनेचा विस्तार या राज्यात होऊ शकला नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन आयोध्या दौरा केला होता. त्यावेळी या दौऱ्याला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. राम जन्मभूमीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी हिंदी पट्ट्यात शिवसेनेच्या विस्ताराची पुन्हा एकदा चाचपणी केली असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेच्या उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये आजही शाखा आहेत. काही ठिकाणी पंचायत समितीवर शिवसैनिक निवडूनही आले आहेत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे वाढदिवस तेथे साजरे केले जातात. त्याचवेळी शिवसेनेच्या कडव्या हिंदुत्वाचे उत्तर प्रदेश, दिल्लीत नेहमीच आकर्षण राहिले आहे. शिवसेनेच्या दृष्टीने पक्षाच्या विस्तारासाठी उत्तर प्रदेश हा अधिक सुपिक असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. राज्यात शिवसेनेला सत्ता मिळाली तर सहाजिकच शिवसेना पक्षाच्या विस्तार इतर राज्यात करण्याचा प्रयत्न करणार हे नक्कीच आहे.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास त्यांचा दबदबा नक्कीच वाढणार, हे भाजपा नेहमीच जाणून आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर शिवसेनेची ताकद वाढणार व तसेच पक्षाची आर्थिक बाजूही भक्कम होण्याची शक्यता आहे. त्याच्या जोरावर शिवसेना पक्षाचा विस्तार उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश अशा हिंदी पट्ट्यात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या हिंदी पट्ट्यात भाजपाच्या हिंदुत्वाच्या मतपेढीत कोणीही भागीदार नाही. ज्याप्रमाणे बसपा, काँग्रेस, समाजवादी पक्ष हे एकमेकांच्या मतपेढीवर डल्ला मारु शकतात, तसे भाजपाच्या मतपेढीवर डल्ला मारणारा कोणताही पक्ष सक्षम नाही. उद्या राज्यात शिवसेना सक्षम झाली. तिच्याकडे मुख्यमंत्रीपद गेले तर ती नक्कीच प्रस्थ नक्कीच वाढणार. त्याचा त्रास भाजपाला उत्तर प्रदेश, दिल्लीत नक्कीच होऊ शकतो. शिवसेनेला येथे जागा मिळाल्या नाही तरी ते वंचितप्रमाणे भाजपाच्या पराभवाला कारणीभूत नक्कीच ठरु शकतात. हे ओळखूनच भाजपाने शिवसेनेबरोबर युती केली तरी तिला कायमच विरोध करत आली आहे. त्यामुळेच इतर पक्षांना मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपा तयार झाली तरी महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणे म्हणजे भविष्यात आपल्या एका विरोधकाला मोठे करण्यासारखे होणार असल्याने भाजपाचा शिवसेनेला विरोध असतो.

Visit : Policenama.com