महाभियोगाच्या नोटीसीवर मनमोहन सिंहांची स्वाक्षरी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह अन्य विरोधीपक्षांनी महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. काँग्रेसह 71 खासदारांनी यासंदर्भातील नोटिसीवर स्वाक्षरी केली आहे. पण या नोटीसीवर माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंह यांची सही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मनमोहन सिंह हे राज्यसभेचे खासदार असताना त्यांची स्वाक्षरी या नोटीसीवर नसल्याने याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांना विचारले असता, त्यांना जाणून-बाजून दूर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान , काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनीही या नोटिसीच्या निर्णयापासून चार हात लांब राहणेच पसंत केले आहे. न्या.लोया मृत्यू प्रकरण किंवा इतर कोणत्याही खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अंतिम असतो. जर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कुणाला आक्षेप असेल, तर त्यावर पुनर्विचार याचिका दाखल करता येऊ शकते, असे मत त्यांनी नोंदवले आहे. शिवाय, काळा कोट आणि पांढरा बँड परिधान करणाऱ्या कायदे तज्ज्ञाने कोर्टाच्या निर्णयावर विचार करुन मत नोंदवले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राजकारण करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

संबंधित घडामोडी:

सरन्यायाधिशांविरोधात काँग्रेससह विरोधकांची महाभियोगाची नोटीस