विधानसभा निवडणूक 2021 : 5 राज्यांच्या निवडणुकीत NRI नाही करू शकणार मतदान, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वपक्षांनी प्रचाराची जय्यत तयारी देखील केली आहे. एकएका मतासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र, या दरम्यान परदेशात राहणाऱ्या भारतीय मतदारांना मार्च आणि एप्रिलमध्ये पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार नाही. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम भारतीय मतदारांना उपलब्ध होणार नाही. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबत माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुविधा देण्यापूर्वी निवडणूक आयोगाला विविध भागधारकांशी सल्लामसलत करण्याची इच्छा आहे. अरोरा म्हणाले, ”एनआरआय मतदारांबाबत निर्णयासाठी निवडणूक आयोगाने मार्ग शोधण्यासाठी कायदेशीर मंत्रालयाला सुमारे दीड महिन्यापूर्वी अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत सकारात्मक चिठ्ठी पाठविली आहे. कायदा मंत्रालयाने हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठविले. मी परराष्ट्र सचिवांशीही बोललो. त्यांनी सविस्तर प्रतिसाद देत म्हंटले की, आपल्याला भागधारकांसह सर्वसमावेशक बैठक व्हायला हवी. ते म्हणाले की, ही बैठक एका महिन्यात होऊ शकते.