‘या’ 4 प्रमुख कारणांमुळं तर PM मोदी सोशल मीडियापासून दूर जात नाहीत ना ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री एक ट्विट करून संपूर्ण देशाला आश्चर्यचकित केले. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे. यानंतर सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क वर्तवण्याचा बाजार गरम आहे. पीएम मोदी यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी अनेक हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

त्यांच्या एका ट्विटवर 63 हजारपेक्षा जास्त लोकांनी कमेंट केले आहेत. एवढेच नव्हे, नो सर सारखे हॅशटॅगसुद्धा सुरू आहेत. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया का सोडत आहेत. परंतु, याचे उत्तर मिळवण्यासाठी देशाला रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यावेळी मोदी स्वत: यावर स्पष्टीकरण देतील. परंतु, सध्या विविध तर्क व्यक्त केले जात आहेत.

दिल्ली हिंसाचार
असेही म्हटले जात आहे की, दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे पीएम मोदी नाराज आहेत. 26 फेब्रुवारीला त्यांनी ट्विट करून शांततेचे आवाहन केल होते. परंतु, रविवारी दिल्लीत सोशल मीडियाद्वारे पसरलेल्या अफवांमुळे खुप समस्या निर्माण झाल्या होत्या.

विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न
असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी असे वक्तव्य केले आहे.

स्वदेशी सोशल मीडिया येत आहे का?
पीएम मोदी यांच्या ट्विटनंतर विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी मेक इन इंडिया बाबत बोलत असतात. यामुळे रविवारी भारताच्या स्वत:च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या लाँचचे वृत्त समजू शकते.

समाजाला संदेश
असेही म्हटले जात आहे की, पीएम मोदी याद्वारे संदेश देत आहेत. सोशल मीडिया आल्यानंतर लोकांनी एकमेकांशी भेटणे बंद केले आहे. यामुळे एकाकीपणा वाढत आहे.