नाथाभाऊंचा फडणवीसांना थेट सवाल, ॲक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो पदाचा सदुपयोग होता का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीसांवर नाव घेऊन आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अनेक खुलासे करत फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. माझ्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. मग आरोप झालेल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना तो न्याय का लावला नाही, असा थेट सवाल त्यांनी केला आहे. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मग ॲक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो काय पदाचा सदुपयोग होता का ? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार ॲक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ॲक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता, हाच मुद्दा खडसेंनी उपस्थित केला आहे. ॲक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवण्यात आले. तो काय पदाचा सदुपयोग होता का ? पदाचे असे अनेक सदुपयोग मी पाहिले असल्याचे खडसे यांनी सांगितले.

इतरांचे राजीनामे का घेतले नाहीत
खडसे म्हणाले, माझ्यावर आरोप झाले, त्यामुळे माझा राजीनामा घेतला. पण पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुभाष देशमुख यांच्यासह अनेकांवर आरोप झाले होते. त्यांचे राजीनामे घेतले का ? असा सवाल त्यांनी विचारला. भाजपचे पदाधिकारी असलेल्या व्ही. सतीश यांनी मला राजीनामा देण्यास सांगितलं. पत्रकार परिषदेत तुम्ही स्वत: राजीनामा देऊन प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्याचे सांगा, अशा सूचना मला करण्यात आल्या. त्यानुसार मी कोऱ्या कागदावर सही केल्याचे खडसे यांनी सांगितले.

अशी उतराई होईल वाटलं नव्हतं
देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले, हे देखील एकनाथ खडेस सांगितले. मी देवेंद्र फडणवीस यांना 2005-06 पासून पाहतोय. ते अभ्यासू आणि होतकरु असल्यानं त्यांना मी संधी दिली. अनेकदा विधानसभेत माझ्या ऐवजी त्यांना पुढे केल. पण आपण ज्यांच्यावर प्रेम केलं, ते पुढे जाऊन असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं, अशा शब्दात खडसेंनी नाराजी व्यक्त केली.

गोपीनाथ मुंडेंनी केली फडणवीसांची शिफारस
सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असताना चांगलं काम करत होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत आला. त्यांनाच पुन्हा संधी दिली जावी, असं राज्य भाजपमधील अनेकांना वाटत होते. त्यावेळी राजनाथ सिंह हे भाजपचे अध्यक्ष होते. एकदा गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले. देवेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस तुम्ही राजनाथ सिंह यांच्याकडे करा, असं सांगितलं. गोपीनाथजी माझे नेते होते. मी त्यांचा सन्मान केला. राजनाथ सिंह यांना फोन करुन मी देवेंद्र यांचं नाव सुचवलं आणि मग देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले, अशा शब्दात घटनाक्रम खडसे यांनी सांगितला.