खासगी रुग्णालयात ‘कोरोना’च्या रुग्णांवर मोफत ‘उपचार’ का नाहीत ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारी रुग्णालयातील भार वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची मदत घेण्याचा विचार केला जात आहे. मात्र, खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारं नाही, प्रत्येक रुग्णाला तितके पैसे देणं शक्य नाही. यामध्ये सुप्रीम कोर्टाने लक्ष घातलं आहे आणि खासगी रुग्णालयं कोरोना रुगणांवर मोफत उपचार का करू शकत नाही, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केली आहे.

त्यामुळे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयांसंबंधात माहिती मागवली आहे. जर खासगी रुग्णालयं रुग्णांवर मोफत उपचार करू शकत नाही तर सरकारने रुग्णालयांना मोफत जमिनी का दिल्या ? असा प्रश्न विचारत सुप्रीम कोर्टाने सरकारलाही धारेवर धरलं आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना म्हटले, खासगी रुग्णालयांना सरकार मोफत जमीन देतं किंवा मोजकीच किंमत लागवतं. त्यामुळे या रुग्णालयात महासाथीच्या वेळी संक्रमितांवर मोफत उपचार करायला हवेत.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात 6387 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 170 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 767 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 4337 इतकी झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे 83 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, 64 हजार 425 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सलग सहाव्या दिवशी रुग्णसंख्या सहा हजारांहून अधिक आहे.