‘या’ 7 कारणांमुळे एकनाथ खडसेंचा पत्ता कट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वच पक्षांच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांचे नाराजीनाट्य महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झाले आहे. भाजपकडून शेवटची यादी जाहीर झाल्यानंतर त्यातही एकनाथ खडसेंचे नाव न आल्याने त्यांचा विधानसभेसाठी पक्षाने त्यांचा पत्ता कट केला असल्याचे स्पष्ट झाले. तथापि, त्यांच्या मुक्ताईनगर या मतदारसंघातून उमेदवारी न देता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना मात्र पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

यावरून खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. खडसे इतर पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या देखील उठत होत्या. मात्र खडसे यांनी या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. तसेच कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना रोहिणी यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारण्यामागे अनेक कारणे असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. यातील संभाव्य कारणे आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत-

१. विधानसभा सभागृहात ऑन रेकॉर्ड खडसे सरकारचे वाभाडे काढत आणि पक्षाला घरचा आहेर देत सतत तोंडघशी पाडत होते. यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतली होती.

२. अशा प्रकारे सभागृहाबाहेरची पक्षविरोधी वक्तव्ये करणे आणि सभागृहाच्या पटलावर काही विषय ऑन रेकॉर्ड आणणं सरकारसाठी अडचणीचे आणि नामुष्कीचे ठरत होते. त्यामुळे पक्षात अंतर्गत वाद असल्याचा संदेशदेखील जनतेपर्यंत जात होता.

३. या सर्व गोष्टींमुळे एकनाथ खडसेंचे हे उपद्रवी मूल्य पक्षसंघटना, पक्षातील इतर वजनदार लोक आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांसाठी त्रासदायक ठरत होते.

४. एकनाथ खडसेंनी नुकतंच वक्तव्य केलं होतं – ‘विरोधी पक्ष नेता असतांना शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचं नाव मला तरी आढळलं नव्हतं’ हे पक्षश्रेष्ठींच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं.

५. अशा प्रकारे खडसेंना उमेदवारी डावलून अप्रत्यक्षपणे पक्षाने कारवाईच केली आहे. याद्वारे पक्षातील इतर उपद्रवी नेत्यांना एक कडक संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

६. या विधानसभा निवडणुकीत खडसेंना संधी दिली तर पुढच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबतच्या चर्चा आणि बातम्या सतत येतच राहणार. ही मुख्यमंत्र्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली असती. तीदेखील पक्षाने टाळली आहे.

७. अर्थात या सगळ्या कारणांचे आणि एकनाथ खडसेंच्या वागण्याचे प्रमुख कारण होते खडसेंची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा. ही समस्या पक्षाने तिकीटच कापून मुळासकट उपटून काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

खडसे यांनी स्पष्ट केली भूमिका :
दरम्यान खडसे यांनी मला उमेदवारी दिली जाणार नाही हे काल स्वतःच स्पष्ट केले होते. मी पक्षाच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असून गेल्या ४२ वर्षांपासून मी ते करतोय. अनेकदा मी पक्षाचे अनेक कटू निर्णय मान्य केले असून आताही पक्ष मला जो आदेश देईल, मी त्याचं पालन करेन असे सांगितले होते. चाळीस वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला का असं वागवलं गेलं, या बाबत मी माझ्या श्रेष्ठींना विचारणार असून माझा गुन्हा काय ते तरी सांगावं, असंही खडसे म्हणाले होते. वरिष्ठांना मी नक्की विचारणार की माझ्या विरोधात कुणी विष पसरवलं असं म्हणत त्यांनी खेदही व्यक्त केला.

visit : Policenama.com