आज शरद पवारांना नक्षलवाद्यांचा पुळका का आला ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचे सरकार असते तर भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही निलंबीत केले असते, असं म्हटलं होते. त्यावर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देशाची घटना आणि संसदीय लोकशाही नाकारणाऱ्या नक्षलवाद्यांचा पुळका का आला, असा सवाल त्यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महागठबंधनचा धुव्वा उडणार असल्याच्या भीतीने शरद पवारांनी आता ही वेगळी वाट स्वीकारली का, असाही सवाल भांडारी यांनी केला.

शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना एल्गार परिषद आयोजित करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांची बाजू घेतली. या आरोपींवर कारवाई करणाऱ्या पोलीस आयुक्तांना आपण निलंबित केले असते, अशी भाषा त्यांनी वापरली. परंतु शरद पवार काही गोष्टी विसरू लागले आहेत. ते स्वतः केंद्रात मंत्री असताना आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्ताधारी असताना अशाच प्रकारे नक्षलवादाला मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती, असं भंडारी यांनी म्हटलं.

आता ज्यांना अटक केली आहे त्यापैकी अनेकांना त्यावेळीही अटक केली होती. त्यातील काही दीर्घकाळ तुरुंगात होते. त्यावेळी या कारवाईला त्यांनी विरोध केल्याचे कोठे वाचनात आले नाही किंवा ही कारवाई करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर पवारसाहेबांनी काही कारवाई केल्याचे वाचनात आले नाही. मनमोहनसिंग सरकारमध्ये पवार कृषीमंत्री असताना त्यांच्या समोर संसदेत या विषयावर चर्चा झाली होती. आपल्या उपस्थितीत आपल्या सरकारने दिलेली माहितीदेखील पवारसाहेब विसरत आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पुण्यातील एल्गार परिषदेमुळे सामाजिक वातावरण बिघडले. त्याच पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमाची दंगल झाली. न्यायालयाने पोलिसांच्या तपासाला किंवा आरोपींना अटक करण्यात प्रतिबंध घातला नसताना पवार यांना मात्र नक्षलवाद्यांवर कारवाई हा सत्तेचा गैरवापर वाटतो, हे अजब आहे. हिंसेचे तत्वज्ञान बनवून सातत्याने हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गटांची पाठराखण शरद पवार का करत आहेत, याचेही त्यांनी उत्तर द्यावे, असे परखड मतीही त्यांनी यावेळी मांडले.