‘या’ कारणामुळे शरद पवारांनी नाकारली PM नरेंद्र मोदींची ‘ऑफर’, स्वतः सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेआधी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये एक महत्वपूर्ण चर्चा झाली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सोबत काम करा अशी ऑफर दिली होती. असा खुलासा स्वतः शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तसेच आपण ही ऑफर नाकारल्याचे देखील सांगितले.

दिल्लीतील भेटीदरम्यान शरद पवारांनी अतिवृष्टी संधर्भात पंतप्रधानांशी चर्चा केली त्यांनतर पंतप्रधानांनी त्यांना थांबण्यास सांगितले आणि आपण एकत्रित काम केल्यास आनंद होईल असे सांगितले. मात्र त्यावर पवार म्हणाले, आपले व्यक्तिगत संबंध चांगले आहेत ते राहतीलही परंतु राजकीय दृष्टया आपण एकत्र काम करणे मला शक्य नाही.

यावेळी मोदींनी पवारांना अनेक गोष्टीबद्दल आपली भूमिका एकसारखी असते मग आपल्यात मतभिन्नता कुठे आहे ? असे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर पवार म्हणाले विरोधाला विरोध करण्याची भूमिका माझी नाही, त्यामुळे त्याची चिंता नको. एकत्रित येण्याचा तुमचा आग्रह मी स्वीकारू शकत नाही मी एक लहानसा पक्ष चालवतो, आमच्या पक्षातील नेत्यांना मी जी दिशा दिली आहे ती काही आता बदलणं शक्य नाही, असंदेखील शरद पवार म्हणाले.

मात्र यावेळी थोडासा विचार केला तर काही प्रश्न उपस्थित होतात. गेल्या विधानसभेला शरद पवारानी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. या वेळी मात्र पवारांना राज्यात आणि केंद्रातही सत्ता मिळणार होती मग अशा वेळी प्रश्न हा पडतो की, शरद पवारांनी ही एवढी मोठी ऑफर का नाकारली असावी.

जर राष्ट्रवादीने भाजपशी हात मिळवणी केली असती तर राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळाली असती परंतु या सत्तेवर संपूर्णतः अंकुश हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा राहिला असता मात्र शिवसेनेत सोबत सत्ता स्थापन करून शरद पवारांनी स्वतःच्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल घेतला आहे. अगदी असाच रिमोट कंट्रोल १९९५ मध्ये शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी मिळवला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यावेळी शरद पवारांना ही ऑफर दिली त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्वसोबत शिवसेनेसहित सत्ता स्थापनेबाबत बोलणी केली होती आणि त्यांना राजी केले होते. अशात पवारांनी जर भाजप सोबत जाण्याचे पाऊल उचलले असते तर त्यांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते.

भाजप आणि राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात निवडणूक लढवल्या होत्या. जनतेने राष्ट्रवादीला भाजप विरोधात मतदान केले होते अशात राष्ट्र्वादीने भाजपसोबत सत्ता स्थापन करणे राष्ट्रवादीच्या मतदारांना रुचले नसते म्हणूनही पवारांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. शिवसेनेच्या नेतृत्वात स्थापन झालेली महाविकास आघाडी आता कितीपट यशस्वी होणार हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.