कर्जमाफी नसताना ‘करुन दाखवले’ असे होर्डिंग कशाला, राजू शेट्टींचा संतप्त सवाल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. सरकारच्या घोषणेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नसताना ‘करुन दाखवले’ असे होर्डींग कशाला लावता असा टोला त्यांनी लगावला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर चालू पीक कर्ज माफ करा अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. तर सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी 8 जानेवारीच्या देशव्यापी बंद मध्ये सहभागी होऊन सरकारच्या डोळ्यात अंजन घालावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजू शेट्टी बोलत होते. यावेळी त्यांनी बोलताना सरकारवर सडकून टीका केली. सरकारकडून दोन लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली मात्र, याचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना होत नाही. ज्यांनी शेती सोडली, जे शेतकरी राहिले नाहीत. त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना जर फायदा होणार नसेल तर तुम्ही शेतकरी कर्जमाफी केली, म्हणून ‘करुन दाखवलं’ अशा होर्डींग लावल्या कशाला असा टोला त्यांनी लगावला आहे.

मागील वर्षापासून खरीप हंगामात सर्व पीक वाया गेली. राज्यात अतिवृष्टी, अवकाळी, महापूर यामुळे शेतकऱ्यांचे सगळ्यात मोठे नुकसान झाले. एकही शेतकरी या नुकसानीपासून वाचू शकला नाही. सप्टेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतली ते शेतकरी जून 2020 मध्ये थकबाकीदार होणार आहे. सरकारला जर या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर, चालू पीक कर्ज माफ केली पाहिजे. अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/