‘ऐकून घेतो म्हणून कसं ही बोलायचं नाही’ ! बाळासाहेब थोरात संतापले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा (Video)

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती बिकट बनत चालली आहे. त्यातच आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने तिव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना रुग्णांवर उपयुक्त असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असताना त्याचा काळाबाजार होत असल्याने गरजू रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळत नाही. रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना बैठकीत गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकोले तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. अकोले तालुक्यातील पंचायत समितीच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी थेट बाळासाहेब थोरात यांनाच जाब विचारला. रेमडेसिविर इंजेक्शन अकोले तालुक्याला का कमी मिळतात, असा अन्याय का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तालुक्यामध्ये कोरोनाची एवढी बिकट परिस्थिती असताना नीट आरोग्य सुविधा पुरवली जात नाही, असे म्हणत तक्रारीचा पाढा त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वाचून दाखवला. त्यामुळे या बैठकीत एकच गोंधळ उडाला. बैठकीतील इतर कार्यकर्त्यांनी मालुंजकर यांना खाली बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मालुंजकर हे प्रश्न विचारत होते.

त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी, आम्हाला वेदना समजत नाहीत का ? माणूस ऐकून घेतो म्हणजे कसं ही बोलायचं हे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी मालुंजकर यांना चांगलेच खडेबोल सुनावले. बैठकीत गोंधळ वाढत असल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले.