जबाबदारी झटकून कस चालेल, हे धोरण अयोग्य ! फडणवीसांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यावर कोणतंही आपत्ती आलं की त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलायची आणि आपण नामानिराळं व्हायचं हे ठाकरे सरकारचं धोरण अयोग्य असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस हे बारामती दौऱ्यावर असतांना त्यांनी ठाकरे सरकारवर ही टीका केली.

राज्यात अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. त्यासाठी फडणवीस हे बारामती दौऱ्यावर, शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. शेतक-यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पंचनामे वगैरे याच्या भानगडीत न पडता सरकारने तातडीने मदत जाहीर करावी. राजकारण करण्याची ही वेळ नाही. केंद्र सरकार मदत देईलच पण राज्य सरकार काही मदत करणार आहे की नाही, जबाबदारी झटकून कसं चालेल

पूरस्थितीमध्ये मदत देण्याची पहिली जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. जेव्हा पुराचं संकट राज्यावर आलं तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन आम्ही सर्वतोपरी मदत करु असं आश्वासन दिलं आहे. प्रत्येक वेळी संकट आलं की जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलायचे आणि आपण नामानिराळं रहायचं हे ठाकरे सरकारचं धोरण योग्य नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.