राम मंदिरासाठी वटहुकूम काढून दाखवा : असदुद्दीन ओवेसी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील बाबरी मशीद, राम जन्मभूमी जमीन वादाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निकालावरील आव्हान याचिकांवर आता थेट नवीन वर्षात सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीनं ओवेसी यांनी राम मंदिराच्या वादावर टिपण्णी केली होती. आता पुन्हा त्यांनी  राम मंदिराच्या वादावर टिप्पणी केली आहे.
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा टिपण्णी केली आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकार अध्यादेश का काढत नाही, प्रत्येक वेळी ते अध्यादेश काढण्याची धमकी देत असतात, टॉम, डिक अँड हॅरी असलेल्या भाजपा, आरएसएस, विहिंप अशा धमक्या देत असतात. तुमच्याकडे सत्ता आहे. मी तुम्हाला आव्हान करतो की, अध्यादेश काढून दाखवा, असंही ओवेसी म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते ओवेसी –
गेल्या काही दिवसांपूर्वीही एमआयएमचे असदुद्दीनं ओवेसी यांनी राम मंदिराच्या वादावर टिपण्णी केली होती. राम मंदिर बांधण्यापासून कोण अडवतंय. त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवावं. भाजपाला देशात धार्मिक विविधता नको, त्यांना उदारमतवाद नको. भाजपाला देशात एकाधिकारशाही राबवयाची आहे. त्या पक्षाचा विविधता आणि कायद्यावर विश्वास नाही, असंही ओवेसी म्हणाले होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर ओवेसींची ही  प्रतिक्रिया आली होती. सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारनं कायदा करायला हवा. कोणत्याही मार्गानं राम मंदिराची उभारणी व्हायला हवी. मात्र राम मंदिर बांधलं गेलंच पाहिजे. केंद्रात सत्ता असतानाही राम मंदिराची उभारणी का केली जात नाही, असा प्रश्न लोकांना पडतो, असंदेखील त्यांनी म्हटलं. मतदार केवळ एक दिवसाचा राजा असतो. त्यामुळे त्यानं नीट विचार करून मतदान करायला हवं. अन्यथा त्या एका दिवसामुळे पाच वर्षे सहन करावं लागू शकतं, असं सरसंघचालक म्हणाले होते.