भूक लागल्यावर मूड का बिघडतो ?

पोलीसनामा ऑनलाइन – भूक लागल्यानंतर अनेकांची चिडचिड होते. मूड बिघडतो. असे होण्यामागील कारण कॅनडातील संशोधकांनी आता शोधून काढलं आहे. यासाठी संशोधकांनी उंदरावर काही प्रयोग केले. उंदराच्या शरीरातील रक्तामधील शर्करा कमी झाल्यानंतर ताणाशी संबंधित असलेल्या त्याच्या शरीरातील कॉर्टिकोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढल्याचे संशोधकांना दिसून आले. शरीरातील ग्लुकोजच्या पातळीतील बदल झाल्यास त्याचा मूडवर दीर्घकाळ परिणाम होता. हायपोग्लिसिमिया म्हणजेच रक्तातील शर्करेची पातळी कमी कमी होणं हे शारीरिक आणि मानसिक तणावाला कारणीभूत असल्याचे या प्रयोगातून स्पष्ट झाले.

संशोधकांनी एका उंदराला ग्लुकोज मेटाबोलिझम ब्लॉकरचं इंजेक्शन देऊन त्याच्या रक्तातील शर्करेची पातळी कमी केली. यानंतर या उंदराला एका चेंबरमध्ये ठेवलं. तसेच उंदराला एका चेंबरमधून दुसऱ्या चेंबरमध्ये जाण्याची मुभा दिली होती. तरीही तो उंदीर दुसऱ्या चेंबरमध्ये जात नव्हता. प्राण्यांनी एखादी गोष्ट टाळणं म्हणजे त्यांच्यातील ताण आणि भीतीचं प्रमुख लक्षण आहे, असे युनिव्र्हसिटी ऑफ गुलेफच्या मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक फ्रान्सिस्को लेरी यांनी सांगितलं. या उंदराच्या वर्तणुकीचं निरीक्षण केल्यानंतर संशोधकांनी त्याची रक्तचाचणीही केली. उंदराला ग्लुकोज मेटाबोलिझम ब्लॉकर दिल्यानं त्याच्यातील ताण वाढवणारे कॉर्टिकोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी जास्त झाली होती.