परदेशी जमिनीवर कोहलीचा ‘विराट’ विक्रम ! WI चा 318 धावांनी ‘धुव्वा’, मालिकेत 1-0 ने ‘आघाडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान विंडीज संघाचा 318 धावांनी दणदणीत पराभव केला. यासह भारतीय संघाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयी खाते देखील उघडले. भारतीय संघाने या सामन्यात विंडीजला विजयासाठी 419 धावांचे आव्हान दिले होते.

भारतीय संघाने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला दुसऱ्या डावात केवळ 100 धावाच  करता आल्या. या डावात विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरशः नांगी टाकली. या डावात इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी विंडीजच्या प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडले. इशांत शर्मा याने पहिल्या डावात देखील विंडीजच्या पाच फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला होता. पहिल्या डावात भारतीय संघाला मिळालेल्या आघाडीच्या जोरावर भारतीय संघाने आपला दुसरा डाव सात बाद 343 धावांवर घोषित केला.

या डावात अजिंक्य रहाणे याने शतकी खेळी करताना हनुमा विहारीबरोबर शतकी भागीदारी देखील केली. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी अनुक्रमे 51 आणि 93 धावांची उत्तम खेळी साकारली. रहाणेने आपले हे शतक 2 वर्षांनंतर साजरे केले. २०१७ मध्ये त्याने शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. पहिल्या डावात देखील त्याने शानदार 81 धावांची खेळी केली होती. या विजयासह भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत 60 गुणांची कमाई केली असून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा 27 वा विजय ठरला आहे. याचबरोबर त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली.

दरम्यान, या कसोटीत मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघ 29 ऑगस्टपासून जमैकामध्ये दुसरा कसोटी सामना खेळणार असून विराट कोहलीच्या नेतृत्वखाली भारतीय संघाने परदेशात मिळवलेला हा 12 वा विजय आहे.

आरोग्यविषयक वृत्त –