धक्कादायक ! उधारीचे पैसे मागितल्याने विधवा महिलेला जिवंत जाळलं

हैदराबाद : वृत्त संस्था – उधारीचे पैसे परत मागायला गेलेल्या एका विधवा महिलेच्या अंगावर आरोपीने पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तेलंगणा राज्यातील मेडक जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकरी बाई (वय 42) असे आगीत जळालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पी. सदत याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकरी बाई या आदिवासी समुदायातील विधवा महिलेने सोमवारी (दि. 8) उधारीचे पैसे मागण्यासाठी आरोपी सदतच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी उधारीवरून आरोपी सदतसोबत सकरीबाईचा वाद झाला.

त्यानंतर संतप्त झालेल्या आरोपीने सकरीबाईच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली केले. त्यानंतर सकरीबाई जिवाच्या आकांताने मदतीसाठी इकडे तिकडे धावत होती. मात्र तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाही. त्यानंतर ती जवळच्याच एका झाडीत अर्धमेल्या अवस्थेत पडली होती. थोड्यावेळाने तिला गावातील काही लोकांनी पाहिले आणि जवळच्याच स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवी घटनेत पीडित महिला 80 टक्के भाजल्याने तिला हैदराबादमधील एका रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी तिचा मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.