धक्‍कादायक ! मुख्यमंत्र्यांनी दिलेली नोकरी गेल्यानंतर ‘त्या’ विधवा महिलेला हवंय ‘इच्छामरण’

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाईन – वाशीम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील एका विधवेने इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. सोनाली लांडगे असं या विधवेचे नाव असून त्या २०१५ मध्ये आत्महत्या केलेले दत्ता लांडगे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या इच्छा मरणाची मागणीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

२०१५ मध्ये शेतकरी दत्ता आत्माराम लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहीत आत्महत्या केली होती. यात त्यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. त्यांना दोन लहान मुलं आहेत. त्यांच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देत दत्ता यांची पत्नी सोनाली यांना वाशीम मदतनीस पदावर तारीख २० सप्टेंबर २०१५ नेमणूक करण्यात आली. या नोकरीतून त्यांना ७ हजार रुपये पगारावर त्या त्यांची उपजीवीका करत होत्या. मात्र त्यांना ११ जून २०१८ सेवेतून कमी करण्यात आले आहे.

शासनाच्या या कृत्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यानंतर नोकरीत सामावून घेण्यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार अमित झनक यांच्यासह अनेकांकडे त्यांनी निवेदन दिले. मात्र त्यांना सेवेत सामावून घेतले नाही. त्यामुळे आता त्यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे.

दरम्यान, सेवेत सामावून घ्या; अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी सोनाली यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही पाठविल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –