फेसबुकवर मैत्री ; १३ वर्षाहून लहान प्रियकराने केले तिचे व्हिडिओ व्हायरल 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर येथील एका चाळीस वर्षीय विधवा महिलेला फेसबुकवर फ्रेंडशिप करणे महागात पडले. ज्या मुलाशी तिने फेसबुकवरुन फ्रेंडशिप केली त्यानेच तिचा अश्‍लील व्हिडिओ बनवून नातेवाईकांमध्ये व्हायरल केला. सदर महिलेने  याप्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी अक्षय ऊर्फ रणविजय शेखर गणवीर (२७, रा कॉसमॉस सोसायटी, सोमलवाडा)  याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून ती दोन मुलांसोबत गिट्टीखदान परिसरात राहते तर अक्षय हा सेल्समॅन आहे. १ जानेवारी २०१८ रोजी अक्षयची महिलेसोबत फेसबुकवरून ओळख झाली. यानंतर त्या दोघांची आधी मैत्री व नंतर प्रेमसंबंध झाले. अक्षय हा नेहमी महिलेला लग्नासाठी आग्रह करीत होता.

मात्र, ती वयाने तेरा वर्षाने लहान असलेल्या अक्षयला लग्नास नकार देत होती. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने तिचे मोबाईलने अश्‍लील व्हिडिओ काढून तिच्यासह नातेवाईकांना पाठवले. तसेच त्याने पीडितेच्या मुलांना जिवे मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवीत त्याला अटक केली आहे.