चारित्र्यावर संशय घेत केलेल्या जबर मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; चौघांवर गुन्हा दाखल 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चारित्र्यावर संशय घेत पत्नीला केलल्या मारहाणीत गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर विवाहित महिलेस काळी आहेस असे चिडवुन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण झाली. त्यात तिचा गर्भपात झाला. या प्रकरणी १ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

निलेश संगम असं त्या पतीचं नाव आहे. तर विमल संगम (सासू), सरिता संगम (नणंद), बलराज संगम (चुलत सासरे) अशी सासरच्या मंडळींची नावे आहेत. सर्वजण औंध रूग्णालय कर्मचारी वसाहत येथील रहिवासी आहेत. या चार जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्याद देणाऱ्या महिलेचा निलेश संगम यांच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. सुरुवातील सर्वकाही सुरळीत चालू होते. परंतु सासू सासरे अचानकच सुनेचा छळ करु लागले. तू काळी आहेस, दिसायला चांगली नाहीस, असे टोमणे मारून तिच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळीकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. यानंतर पतीने तिला जबर मारहाण केली. यात तिचा गर्भपात झाला. यानंतर सदर महिलेने  पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

सदर महिलेचा पती निलेश संगम हा तिला रंगावरून हिनवत असे. शिवाय माहेरहून पैसे आणण्यासाठी तिला मागणी करत असे. पैसे आणिले नाही म्हणून तिला नेहमी मारहाण करत असे. निलेशने तिला बेदम मारहाण केली. तसेच भिंतीवर ढकलून दिले. त्यात तिच्या पोटाला धक्का लागल्याने गर्भपात झाला. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे, नणंद, चूलत सासरे यांच्याविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.