वटपौर्णिमेदिवशीच पत्नीसह मेहुण्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नी आणि मेहुण्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची खळबजनक घटना लातूरमध्ये घडली आहे. तर या घटनेत सासु गंभीर जखमी झाली आहे. पत्नी आणि मेहुण्याचा खून करून आरोपी पती लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला.

पत्नी सुवर्णा विकास भोपळे आणि मेहुणा युवराज निरुडे असे खून झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसास, लातूर जिल्ह्यातील भातांगळी येथील सुवर्णाचा विवाह शिरुर आनंतपाळ तालुक्यातील विकास भोपळे याच्याशी झाला होता. त्यांना दोन अपत्ये असून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. पती विकास हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. तसेच सुवर्णाला विकासकडून होत असलेल्या मारहाणीमुळे विकासने बहिणीला चार दिवसांपूर्वी माहेरी घेऊन आला होता.

शनिवारी मध्यरात्री विकास दुचाकीवरून सासरी आला. त्याने बाहेर झोपलेल्या सुवर्णावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. पत्नीला मारल्यानंतर मेहुणा आपल्याला सोडणार नाही या भितीने त्याने मेहुणा युवराजवर देखील सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच आरोपी विकासने सासुवर देखील वार केले. या घटनेनंतर विकास भोपळे हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.