‘पत्नी खर्रा खाते म्हणून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही’ – हायकोर्ट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नली खर्रा खाण्याचं व्यसन असणं ही अतिशय गंभीर बाब आहे. परंतु एकमेव या कारणावरून पतीला घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्तीद्वय अतुल चांदूरकर आणि पुष्पा गणेडीवाला यांनी दिला आहे. एका प्रकरणावर सुनावणी करताना त्यांनी हा निर्णय दिला आहे.

या प्रकरणातील दाम्पत्य शंकर आणि रीना हे नागपूर येथील रहिवाशी आहेत. 15 जून 2003 रोजी शंकर आणि रीना यांचा विवाह झाला. शंकरला रिनापासून घटस्फोट हवा होता. ती घरातील दैनंदिन कामं करत नाही. क्षुल्लक कारणावरून भांडण करते. कुणालाही न सांगता माहेरी जाते. तिथं एकेक महिना राहते. रोज टिफिन करून देत नाही. ती 17 जानेवारी 2012 रोजी विभक्त झाली. कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतरही ती परत आली नाही. तिची संसार करण्याची इच्छा नाही. तसंच तिला खर्रा खाण्याचं व्यसन आहे. यामुळं तिच्या पोटाच्या आजारावर उपचार करण्यासाठीही मोठा खर्च करावा लागतो असे आरोप शंकरकडून घटस्फोट मिळवण्यासाठी करण्यात आले होते.

दरम्यान खर्रा खाण्याचं व्यसन वगळता इतर आरोप सामान्य स्वरूपाचे आहेत आणि सदर किरकोळ वाद हे संसारात घडत राहतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे. पत्नी खर्रा खाते हा आरोप गंभीर आहे, परंतु त्या एकमेव कारणावरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

सुरुवातील घटस्फोट घेण्यासाठी शंकरनं कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. 21 जानेवारी 2015 रोजी ही याचिका फेटाळण्यात आली होती. या निर्णयावरून शंकरनं उच्च न्यायालयात दाद मागत अपील केलं होतं. परंतु उच्च न्यायालयातही त्याची निराशा झाली.

लग्न टिकण्यात मुलांचं हित
शंकर आणि रीना यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी शंकर सोबत तर मुलगा रीना सोबत राहते. कुटुंब न्यायालयानं असं मत व्यक्त केलं होतं की, या मुलांचं हित शंकर आणि रीना यांचं लग्न टिकून राहण्यात आहे. उच्च न्यायालयानंही या भूमिकेचं समर्थन केलं आहे.