पतीच्या मृतदेहाला मारली मिठी अन् पत्नीनेही सोडले प्राण

भागलपूर : वृत्त संस्था – पती-पत्नीचे नातं अतूट असतं असं म्हटलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीत जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून अनेक महिला व्रतही करत असतात. अशाचप्रकारची घटना बिहारच्या भागलपूरमधील कहल गावात घडली. एका 100 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले होते. हे समजल्यानंतर पत्नीनेही जीव सोडला.

जागेश्वर मंडल असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले होते. पतीच्या निधनाची बातमी समजातच 90 वर्षीय पत्नी रुक्मिणी देवी यांनीही प्राण सोडला. सकाळी पतीच्या निधनाची बातमी समजल्यानंतर रुक्मिणी देवी यांना धक्का सहन झाला नाही. जागेश्वर मंडल यांच्या मृत्यूनंतर रुक्मिणी त्यांच्या मृतदेहाजवळ गेली. तिने पतीच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली. हातात हात घेतला आणि तिनेही जगाचा अखेरचा निरोप घेतला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, मंडल दाम्पत्याने अनेक वर्षे एकत्र संसार केला. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. तरीही त्यांना रुक्मिणी यांनी शेवटपर्यंत साथ दिली. या दाम्पत्यानी शेवटपर्यंत साथ निभावण्याची वचनेही दिली होती. पतीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पत्नीने प्राण सोडला. याप्रकारे त्यांनी दिलेली वचनेही निभावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.