पत्नीनेच दिली भाजपा नेत्याच्या हत्येची सुपारी, सुदैवाने वाचला जीव

बलिया : यूपीच्या बलियामध्ये पत्नीनेच भाजपा नेत्याच्या हत्येची सुपारी दिली. सुदैवाने त्याचा जीव वाचला. यातील दोन सुपारी किलर पोलिसांना सापडले आहेत. पोलिसांनी भाजपा नेत्याच्या पत्नीसह चार लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुखपुरा गावात राहणारे भाजपा नेते ठाकुर अनूप सिंह 2016 मध्ये भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद उमेदवार होते. सध्या किसान मोर्चा राष्ट्रीय प्रवक्ता आणि भारत संरक्षण मंचाचे राष्ट्रीय मंत्री आहेत. बांसडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुल्तानपुर येथे राहणारी त्यांची पत्नी विभा सिंह हिच्याशी त्यांचा कौटुंबिक वाद फॅमिली कोर्ट बलियामध्ये सुरू आहे.

या दरम्यान, त्यांच्या पत्नीने अनूप यांच्या हत्येचा कट रचला. पतीच्या हत्येसाठी सुपारी दिली. सुपारी दिल्यानंतर एका गुन्हेगाराने काही कारणामुळे अनूपशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्या पत्नीशी झालेल्या चर्चेचा ऑडिओ सुद्धा दिला. अनूप यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मंगळवारी असेगा पेट्रोल पम्पजवळ सहतवार वार्ड चार येथे राहणारा छोटे सिंह उर्फ सतीश सिंह आणि मणियर ठाण्याच्या हद्दीतील मुडियारी येथील राहणारा अख्तर अन्सरी यांना अटक केली.

भाजपा नेता ठाकुर अनूप सिंहची हत्या लखनऊमध्ये एका प्रायव्हेट स्कूलच्या समोर करण्याची तयारी केली होती. त्यांची पत्नी विभाने गुन्हेगारांना काही रक्कम अगाऊ दिली होती. बाकी रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे ठरले होते.

विभाशी प्रेम विवाह करणार्‍या या भाजपा नेत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. काही वर्षापूर्वी पत्नीसोबतचे वादाचे प्रकरण कोर्टात गेले होते. दोन्ही मुले विभाकडे राहात असल्याने त्यांच्या शिक्षणाची चर्चा अनूपशी केली. ठरले होते की, लखनऊमध्ये मुलीचे अ‍ॅडमिशन घेतले जाईल. विभाने प्रवेशासाठी शाळेत आल्यानंतर हत्या करण्याची तयारी केली होती.

गुन्हेगारांनी पूर्णपणे जाळे लावले होते. मात्र, याचा सुगावा लागल्याने अनूप यांनी स्वता शाळेत जाण्याऐवजी आपल्या एका माणसाला पाठवले. यानंतर कट फेल झाला. यापूर्वी त्यांच्या गावात सुद्धा हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, परंतु तो यशस्वी झाला नाही.