प्रेमात विवाहिता आंधळी ! पतीला झोपेच्या 35 गोळ्या दिल्या पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या गोपी नाईक या पोलिओग्रस्त पतिची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याप्रकरणी प्रिया नाईक आणि महेश या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रियाने आपल्या पतीला ठार मारण्यासाठी चक्क ३५ गोळ्या दिल्या, तरीही पतीला काही झाले नाही म्हणून प्रियकराच्या मदतीने फिनायलचे इंजेक्शन टोचून त्याची हत्या केली. त्यानंतर फरार झालेल्या प्रिया आणि महेश नामक तिच्या प्रियकराला माथेरान इथून अटक करण्यात आली आहे.

फेसबुक वरून झाली होती मैत्री
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गोपी आणि प्रिया हे दाम्पत्य आपल्या सात वर्षीय मुलीसोबत ठाणे महापालिकेच्या क्वॉर्टरमध्ये राहात होते. नऊ वर्षांपूर्वी गोपी आणि प्रियाचा विवाह झाला होता. गोपी आणि प्रियामध्ये दोनवर्षांपासून वाद सुरु होते. फेसबुकच्या माध्यमातून प्रियाची मैत्री महेश नामक तरुणाशी झाली होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधबाबत गोपीला माहिती मिळाली होती. गोपीच्या नातेवाईकाने एका मॉलमध्ये प्रिया आणि महेशला एकत्र पाहिले होते. नंतर गोपीने प्रियाला समजही दिली होती. परंतु प्रियाने त्याचे काही ऐकले नाही. प्रियाने गोपीचा काटा काढण्याचे ठरविले. प्रियाने आपला कट महेशलाही सांगितला होता. महेश हा रेल्वे कर्मचारी असून तो नेरळमध्ये राहातो.

असा रचला पतीच्या खुनाचा कट
गोपीला पोलिओ आहे. याचा फायदा घेऊन प्रियाने महेशच्या मदतीने त्याच्या जेवणात झोपेच्या 15 गोळ्या मिसळल्या. झोपेच्या गोळ्या महेश याने आणून दिल्या होत्या. जेवण केल्यानंतर गोपी बेशुद्ध झाला. प्रियाला वाटले गोपीचा मृत्यू झाला. नंतर तिने महेशला आपल्या घरी बोलावून घेतले. परंतु काही वेळतच गोपीला शुद्ध आली. तिथे प्रियाचा प्लान फेल झाला. नंतर तिने सायंकाळी गोपीच्या जेवणात 20 गोळ्या दिल्या. गोपी पुन्हा बेशुद्ध झाला. नंतर महेश पुन्हा आला. त्याने आपल्यासोबत फिनायलचे इंजेक्शन आणले होते. प्रियाने फिनायलचे इंजेक्शन गोपीला टोचले. महेशने गोपीचे डोके भिंतीवर आदळले. नंतर त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. २८ डिसेंबर ला ही घटना घडली.

दुसर्‍या दिवशी 29 डिसेंबरला सकाळी गोपीचा मृत्य झाला. नंतर प्रिया आणि महेश त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. गोपीचा अपघात झाला असा बनाव केला. हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. हे पाहून प्रिया आणि महेश हॉस्पिटलमधून फरार झाले होते. पोलिसांनी दोन्ही आरोपींना 1 जानेवारीला माथेरान येथून अटक केली.