काय सांगता ! होय, ब्यूटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने बायको पळाली, 5 वर्ष न परतल्याने सासुरवाडीच्या बाहेर जावयाचे ‘धरणे’

अजमेर : वृत्तसंस्था – सुलहकुल नगर (जगदीशपुरा) मध्ये एक तरूण आपल्या सासुरवाडीच्या बाहेर शनिवारी धरणे धरून बसला. त्याला जाणून घ्यायचे आहे की बायकोने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच त्याला का सोडले. त्याच्यासोबत का राहत नाही. सासरच्यांनी त्याच्यासाठी दरवाजा उघडला नाही. रविवारी सायंकाळपर्यंत तरूण सासरवाडीच्या बाहेर खुर्चीवर बसून होता.

अजमेर (राजस्थान) च्या वैशाली नगर येथील रहिवाशी अविनाश वर्माचा विवाह दोन मे 2015 ला झाला होता. सासुरवाडी सुलहकुल नगरमध्ये आहे. अविनाशने सांगितले की, तो अकाऊंटंट आहे. लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याची घरात तयारी सुरू होती. पत्नी ब्यूटी पार्लरला जाते म्हणून सांगून गेली, ती परत आलीच नाही. ती आपल्या माहेरी आली. माहिती मिळाल्यानंतर तो आग्रा येथे आला. सासरच्यांना भेटला. पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला.

सासरच्यांनी त्याला सांगितले की, तीन-चार दिवस मुलीला येथेच राहू द्या. तुम्ही परत जा. त्यांच्या या अश्वासनावर तो परतला. काही दिवसानंतर त्याच्या घरी पोलीस धडकले. त्याला माहिती मिळाली की पत्नीने महिला आयोगात तक्रार केली आहे. महिला आयोगाने पोलिसांना तपासाचे निर्देश दिले आहेत. तक्रारीमुळे तो आणि त्याचे कुटुंबिय घाबरले. त्याने सुद्धा अजमेर कोर्टात पत्नीच्या विरूद्ध खटला भरला. माहिती मिळाल्यानंतर पत्नीने आग्रामध्ये त्याच्याविरूद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोटगीचा खटला सुद्धा दाखल केला. पत्नीशी वाद सुरू झाल्याने आई-वडिलांनी त्याला संपत्तीतून बेदखल केले. धावपळीत त्याची नोकरी गेली.

आता ईकडे-तिकडे काम करून तो पोट भरत आहे. त्याला जाणून घ्यायचे आहे की, अखेर पत्नी त्याच्या विरोधात का गेली होती. त्याच्यासोबत रहायचे आहे की असेच वेगळे रहायचे आहे. पत्नी त्याच्याशी बोलत नाही. यासाठी त्याने धरणे धरले. अविनाशने हे सुद्धा सांगितले की, येथे धरणे धरणार असल्याचे समजल्याने पत्नी तिच्या कुणा नातेवाईकाडे निघून गेली आहे. शनिवारी रात्रभर तो उघड्यावर बसून होता. सासरच्यांनी त्याच्यासाठी दरवाजाही उघडला नाही, पण आजूबाजूच्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. त्याला बसायला खुर्ची दिली. पाणी आणि चहा दिला. जेवण हवे का विचारले.

मात्र, त्याने जेवण ऑनलाईन ऑर्डर करून मागवले. तर दुसरीकडे पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकाराची माहिती त्यांना मिळालेली नाही. कोणत्याही बाजूकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. पती-पत्नीचे भांडण आहे. पोलिसांपर्यंत प्रकरण आले तर पोलीस कौन्सिलिंग करतील. कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल.