पती रात्री उशीरापर्यंत TV बघतो म्हणून पत्नीने उचलल टोकाचे पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पती रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहत होता म्हणून पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या इंदुरमधून समोर आली आहे. गुरुवारी (दि. 18) घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुरच्या लसूडिया परिसरात राहणा-या 23 वर्षीय महिला सोनूचा पती अर्जुन माराठा हा रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघत होता. सोनूने पतीला टीव्ही बंद करण्यास सांगितले. पण त्याने टीव्ही बंद केला नाही. यानंतर ती नाराज होऊन दुसऱ्या खोलीत गेली. रात्री साधारण 3 वाजता पती झोपेतून जागा झाला त्यावेळी त्याला पत्नी फासावर लटकलेली दिसली. त्याने तातडीने पत्नीचा मृतदेह खाली उतरवला आणि तिला घेऊन हॉस्पिटलला गेला. पण उपचारादरम्यान शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.