चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा आला ‘वैताग’, मुलाच्याच मदतीनं ‘असा’ काढला त्याचा ‘काटा’ !

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीने मुलाच्या मदतीने खून केल्याची घटना वलीव येथे घडली आहे. सततची मारहाण आणि चारित्र्यावर घेत असलेल्या पतीचा मुलाच्या मदतीने निर्घृण खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत तिने मुलाच्या मदतीने गुन्हा केल्याचे समोर आले आहे.

वलीव गावातील मराठी शाळेमागे असलेल्या रमेश माळवी बिल्डिंगमध्ये राहणारा अंकुश धोंडू चव्हाण (वय-45) याचा शनिवारी अति दारू पिल्याने रात्री साडे अकराच्या सुमारास मृत्यू झाल्याची तक्रार मुलगा कृष्णा चव्हाण (वय -19) याने दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालानंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पत्नी शोभा चव्हाण आणि मुलगा कृष्णा चव्हाण यांना अटक केली आहे.

मयत कृष्णा चव्हाण याला दारू पिण्याचे व्यसन होते. दारू पिऊन तो पत्नी शोभा आणि मुलांना मारहाण करत होता. दारूसाठी घरातील दागिने व पैसे घेऊन जात होता. तसेच पत्नी शोभा आणि मुलगी पूजा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करत होता. शोभा काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिची बदनामी करत होता. सर्वांसमोर तिला मारहाण करत होता. हे नित्याचेच झाल्याने त्याच्या या त्रासाला शेजारी देखील वैतागले होते. घर मालकाने देखील घर सोडण्यास सांगितले होते. त्याच्या अशा वागण्यामुळे त्यांना कोणीच घर देत नव्हते.

शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कृष्णा दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नी शोभा, मुलगी पूजा आणि मुलाला शिविगाळ करत खाटेवर झोपला. संतापलेल्या शोभाने मुलाच्या मदतीने त्याचा ओढणीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह घराबाहेर वरांड्यावर ठेवून दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची खोटी तक्रार पोलिसांत दिली. मात्र, चौकशीत शोभाने मुलाच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत पराड करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like