पसंत नव्हता म्हणून ३ महिन्यातच पतीचा काढला काटा

कल्याण : पोलिसनामा ऑनलाईन – घरात शिरलेल्या चोरांनी आपल्या पतीला मारहाण करुन त्याची हत्या केल्याची तक्रार कोळशेवाडी पोलिसांकडे एका नवविवाहितेने केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. शवविच्छेदनाचा रिर्पोट आला आणि पोलीसच बुचकळ्यात पडले. त्यांनी हत्या झालेल्याच्या नवविवाहित पत्नीकडे चौकशी केल्यावर तिनेच आपल्या पतीला जेवणात विष कालवून बेशुद्ध केले व त्यानंतर वायरने गळा दाबून त्याची हत्या केल्याचे उघड झाले. आवडत नसताना तिचा जबरदस्तीने विवाह लावून दिल्याने लग्नानंतर तीन महिन्यातच तिने पतीची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

जगदीश साळुंखे (रा. कोळशेवाडी, कल्याण पूर्व) असे हत्या झालेल्या पतीचे नाव असून पोलिसांनी त्याची पत्नी वृषाली हिला अटक केली आहे. जगदीश आणि वृषाली यांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. पण जगदीश आवडत नसल्याने वृषाली हिचा सुरुवातीपासून लग्नाला विरोध होता. असे असतानाही तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने डिसेंबरमध्ये त्यांचे लग्न लावून दिले.

वृषालीला जगदीश आवडत नव्हता. यातून दोघांचे वाद सुरू होते. ६  मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरात चोर आले होते. त्यांनी माझे पती जगदीशची हत्या केली असा कांगावा करत वृषाली हिने  कोळशेवाडी  पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी नोंद करत जगदीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पुढील तपास सुरू केला. शवविच्छेदनाच्या अहवालात जगदिशला विषारी पदार्थ खायला देऊन गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांना हत्या झाल्याचा बनाव करणाऱ्या वृषालीवर संशय आला. त्यांनी वृषालीला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. काही वेळातच वृषालीचा बनाव उघडा पडला. तिनेच आपण जगदीशला मारल्याची कबुली दिली.