लॉकडाऊनमुळं बायको माहेरी अडकली, पठ्ठयानं पाहुण्यातल्या मुलीशी केलं दुसर लग्न

बरेली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू लोकांचा जिव घेत असताना आता त्याचा परिणाम लोकांच्या वैवाहिक जीवनावर पडताना दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये नुकताच तिरेही तलाकचा प्रकार उघडकीस आला आहे. बरेली येथील एका व्यक्तीने पत्नी लॉकडाऊनमुळे माहेरी राहिल्याने त्याने दुसरे लग्न केल्याचा आरोप पहिल्या पत्नीने केला आहे. दरम्यान पहिल्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. परंतु लॉकडाऊनमध्ये गुंतलेल्या पोलिसांनी अद्याप तिची तक्रार दाखल करून घेतली नाही.

कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नात्याला तडा जाण्याची घटना घडली आहे. लॉकडाऊनमुळे पत्नी माहेरी अडकल्याने पतीने पहिल्या पत्नीला सोडून देत दुसरे लग्न केले. नईम आणि नसीम हे पती पत्नी असून त्यांना मुले देखील आहेत. नसीम ही आपल्या मुलांसमवेत माहेरी गेली आणि लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे तिला परत येता आले नाही. त्यामुळे पती नईम याने आपल्याला आणि मुलांना सोडून देत नात्यातीलच एका मुलीशी दुसरे लग्न केल्याचा आरोप नसीमने केला आहे.

नइमवर असा आरोप करण्यात येत आहे की, त्याने आपली पत्नी नसीम हिला 19 मार्च रोजी माहेरी पाठवून दिले. याच दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे नईमच्या पत्नीला सासरी येता आले नाही. त्यानंतर पती नइमने 20 एप्रिल रोजी लॉकडाऊनमध्येच आपल्या नात्यातील एका मुलीशी लग्न केले. नइमची पहिली पत्नी नसीम 12 मे रोजी आपल्या पतीच्या घरी आली त्यावेळी तिला पतीने दुसरे लग्न केल्याचे समजले.

पतीने दुसरे लग्न केल्याचे समजताच नसीमच्या पाया खालची जमीनच सरकली. तिने तातडीने मेरा हक फाऊंडेशनचे अध्यक्ष फरहत नक्वी यांच्याशी संपर्क साधला. नक्वी यांनी या प्रकरणाची दखल घेत सांगितले की पीडित महिलेने आपली तक्रार बरेली येथील प्रेम नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. परंतु अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. आम्ही पोलिसांच्या कारवाईची प्रतिक्षा करित आहोत.