Coronavirus : कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला ‘कोरोना’ची लागण, संपूर्ण कुटुंबावर डॉक्टरांची ‘नजर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या रोगाने जगभरामध्ये थैमान घातले असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये काही देशांमधील प्रमुख व्यक्तींचाही समावेश आहे. इराणमधील तीन खासदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आता कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीलाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सोफी जस्टिन ट्रुडो यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सोफी यांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यापार्श्वभूमीवर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचे निकाल नुकतेच हाती आले असून सोफी यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील माहिती कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयानेच दिली आहे.

दरम्यान, सोफी यांना कोरोना झाला असला तरी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसून येत नसल्याचे कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. सोफी यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्रुडो कुंटुंबाला इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांची नजर असणार असून ट्रुडो पुढील 14 दिवस घरूनच काम करणार आहेत. ट्रुडो शुक्रवारी आणि शनिवारी काही अधिकार्‍यांना भेटणार होते. मात्र पत्नीची कोरोना चाचणी घेण्यात आल्यानंतर या चाचणीचा निकाल येण्याआधीच ट्रुडो यांनी आपल्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांशी ते फोनवरुनच चर्चा करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.