निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीचा पोलीस ठाण्याच्या आवारात पेटवून घेण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याच्या कारणावरून निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीने हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात स्वत: वर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

प्रेरणा दत्तात्रय मदने असे महिलेचे नाव आहे. महिलेने ३ एप्रिल रोजी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्याची दखल हडपसर पोलिसांनी घेतली नाही. असा आरोप केला आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रेरणा मदने या हडपसर पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

असा आहे आरोप
प्रेरणा मदने या निलंबित सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने यांच्या पत्नी आहेत पोलीस कर्मचारी राहूल वेताळ यांनी त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याची तक्रार त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात केली आहे. परंतु पोलीस त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर झालेल्या अन्यायाला दाद दिली नाही. तसेच अनेक प्रकारे माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राहूल वेताळ व त्याच्या नातेवाईकांनी मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला जीवन नकोसे झाले आहे. पोलीसही या गंभीर तक्रीरीची दखल घेत नाहीत. माझ्यावर व माझ्या पतीवर खोटे गुन्हे दाखल करण्याची भिती दाखवत आहेत. त्यामुळे जीवन संपवून घेणे हा एकमेव पर्याय आहे.