Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यामुळंच पतीचा मृत्यू झाल्याचा पत्नीचा दावा, भारत बायोटेकनं संबंधच नसल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दीपक मरावी हे भोपाळच्या इंदिरा कॉलनीमधील रहिवाशी होते. ते सध्या या जगात नाहीत. १२ डिसेंबर रोजी दीपक हे कोव्हॅक्सिनच्या चाचणीमध्ये सहभागी झाले होते, २१ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्युनंतर पत्नी वैजयंतीही काही दिवस आजारी होती, ती म्हणाली, आता आमचा आधार गेलाय, कुटुंब कसं उभं करायचं हे माहिती नाही. कोरोना लस घेण्यास नकार दिला तरीही त्यांनी ऐकलं नाही.

दरम्यान, दीपकच्या मृत्यूनंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनशी याचा काहीही संबंध नाही असं म्हटलं, तर रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, १२ डिसेंबर रोजी प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना पहिला डोस दिला, ७ दिवसापर्यंत त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली गेली, त्यात कोणताही त्रास नाही असं दीपकने सांगितले, तर कुटुंबाचा आरोप आहे की, आम्हाला कोणत्याही प्रकारे फोन आला नाही, कोणीही परिस्थिती जाणून घेतली नाही. इतकचं नाही तर ८ जानेवारीला रुग्णालयाकडून दुसऱ्या डोससाठी फोन आल्याचं दीपकच्या मुलाने सांगितले.

दीपक कोरोना लस चाचणीसाठी कसे गेले ? यावर वैजयंती म्हणाली, ज्याठिकाणी ते मजुरी करत होते, तिथे कोणीतरी सांगितले कोव्हॅक्सिन लावल्यानंतर ७५० रुपये मिळतील, ते घरात सगळ्यांना लस घेण्यासाठी बोलत होते, परंतु मी नकार दिला. जेव्हा ते इंजेक्शन घेऊन आले तेव्हा घरी कोणालाच सांगितले नाही, त्यांच्याकडे कागदही नव्हता. जेव्हा त्यांचा हात दुखू लागला तेव्हा छोट्या मुलाला सांगितले इंजेक्शन घेतलं आहे. तु आईला सांगू नको, लस घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी त्यांची तब्येत बिघडली. २-३ दिवस जेवण करणं सोडून दिलं, तब्येत ढासळत गेली, नंतर उलट्या सुरू झाल्या. औषधे द्या, डॉक्टरांना दाखवा सांगितलं तर ते आम्हालाच ओरडले.

२० डिसेंबर रोजी दीपकची तब्येत आणखी बिघडली, त्यांनी जेवणं सोडलं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २१ डिसेंबरला अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये दीपकच्या शरीरात विष आढळलं, यावर पत्नी वैजयंती म्हणाली, ते पागल होते का, म्हणून विष प्यायले, विष पितो तेव्हा आपल्याला माहिती पडत नाही का? जर लस घेतल्यामुळे मृत्यू झाला नाही तर इंजेक्शन टोचल्यानंतर ते आजारी कसे पडले? त्यांनी चालणं-फिरणं सोडून दिलं, उलट्या का करू लागले? जर पोस्टमोर्टम रिपोर्ट योग्य असेल तर तो येण्यास इतका विलंब का लागला? १२ दिवस आम्ही भटकत राहिलो, आम्ही गरीब, अशिक्षित आहोत, ज्याच्याकडे पैसा आहे ते रिपोर्टमध्ये काहीही लिहू शकतात ते आम्ही कसं मानायचं? देवाने जरी सांगितलं तरी मी ते मान्य करणार नाही. ते कधी आजारीही पडत नव्हते. त्यांना कसलाही त्रास नव्हता आणि कसलं टेन्शनही नव्हतं असं पत्नीने सांगितले.

आजही अनेक प्रश्न अनुत्तरीत …
– दीपकच्या मृत्यूनंतर १८ दिवसांनी रुग्णालय प्रशासनाने स्वयंसेवकाच्या यादीतून दीपकचं नाव का काढलं नाही?
– डॉक्टर्स वारंवार दीपकच्या घरच्यांकडून अपडेट घेत होते, मग कुटुंबाच्या म्हणण्यानुसार आजारी असताना ते घरी का पोहचले नाहीत.?
– मृत्यूनंतर तपासात बनवण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये ३ तासात रुग्णालय प्रशासनाला क्लीनचिट कशी दिली?