चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुनाचा प्रयत्न

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – चारित्र्याच्या संशयावरून पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी येथे पतीने पत्नीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती संदीप साहेबराव लवांडे याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, लवांडे हा 1 जानेवारी रोजी दारू पिऊन घरी आला. चारित्र्याच्या संशयावरून त्याचा काही दिवसांपासून पत्नीशी वाद सुरू होता. त्या रागातूनच लवांडे याने घरी आल्यानंतर पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील भांडण सुरू असताना त्याने पत्नीच्या तोंडात विषारी औषध ओतले.

तोंडात विषारी औषध गेल्यामुळे पत्नीला उलट्या सुरु झाल्या. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. गुरुवारी (दि. 4) दुपारी पत्नीचा जबाब पाथर्डी पोलिसांनी नोंदविला. तिच्या फिर्यादीवरून पती संदीप लवांडे यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जावळे हे करीत आहेत.

सुप्यात 44 लाखांचा हिरा पान मसाला जप्त

नगर: हिरा पानमसाला व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो अन्न व औषध प्रशासनाने सुप्यातील एमआयडीसी चौकात पकडला. या टेम्पोतून 44 लाख रुपयांचा माल जप्त  करण्यात आला आहे.
याप्रकरणी नजीर बाबा शेख (रा. झेंडीगेट, नगर) याला अटक करण्यात आली आहे. शेख हा आयशर टेम्पो घेऊन सुपा परिसरातून चालला होता. अन्न व औषध प्रशासन विभागाला संशय आल्याने त्यांनी सदर आयशर टेम्पो थांबविला. टेम्पोची धडक घेतली असता आतमध्ये हिरा पान मसाला, हिरा सुगंधी तंबाखू सुमारे 44 लाख 48 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल सापडला. अन्न व औषध प्रशासन विभागाने शेख याला ताब्यात घेऊन सुपा पोलीस ठाण्यात नेले. तेथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कालिदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून नजीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत.