पत्नीचा खून करून ‘त्यानं’ अर्धा भाग ठेवला फ्रिजमध्ये, नाल्याजवळ आढळला जळालेला ‘मृतदेह’

माजलगाव/बीड : पोलीसनामा ऑनलाइन – माजलगाव शहरातील इंदीरानगर भिमटेकडीच्या बाजूला असलेल्या नाल्याच्या कडेला आज (सोमवार) दुपारी एकच्या सुमारास अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. माजलगाव शहर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून अवघ्या चार तासात आरोपीला अटक केली. मोबाईल गहाण ठेवण्यावरून झालेल्या भांडणातून पत्नीचा खून केल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले. खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून तब्बल नऊ दिवस फ्रिजमध्ये ठेवले.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील इंदिरानगर भिमटेकडीच्या बाजूला असलेल्या नाल्यालगत एक अर्धवट माणसाचे प्रेत जळालेले लोकांना दिसून आले. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा चेहरा पूर्ण जळालेला आणि शरीराचा अर्धा भाग नसलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी चार तासात संशयीत आरोपीचा शोध घेऊन संजय रघुनाथ साळवे उर्फ अब्दुल रेहमान याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोबाईल गहाण ठेवल्याच्या कारणावरून 26 नोव्हेंबर रोजी वाद झाले होते. याच कारणावरून 30 नोव्हेंबर रोजी भांडण झाल्यानंतर तिचा गळा दाबून आणि डोक्यात कत्ता घालून खून केला.

तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील ड्रममध्ये मृतदेह टाकून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह न जळाल्याने तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. आज सकाळी सहाच्या सुमारास कंबरे खालील भाग फ्रिजमध्ये ठेऊन उर्वरीत भाग इंदीरानगर भिमटेकडी जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली दिली. पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करीत आहेत.