…हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अगदी जोरात सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, याप्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीवाल यांनी सुद्धा राम मंदिराच्या भूमिपूजनबद्दल आपले मत व्यक्त केलं आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “कोरोना संसर्गामुळे देशाची स्थिती अत्यंत वाईट बनली आहे. प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आमच्याबरोबर असल्याचे मी मानतो. म्हणून आम्ही सर्वजण कोरोनाविरुद्ध लढत आहे. आमच्या डॉक्टरांकडे रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी अत्यावश्यक सामग्री देण्याची ही वेळ आहे. देशातल्या गरिबांचा जीव वाचवणे, जो घाबरलेला आहे त्याच्या मनातली भीती कमी करणे, त्यांना मदत करणे, शिक्षण देणे, आरोग्य सेवा पुरवणे हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल, असे त्यांनी म्हटलं आहे.” एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलते बोलत होते.

चिनी वस्तूंची आयात थांबवावी

भारत चीन तणावाबाबत बोलतांना त्यांनी सांगितलं “जेव्हा मैत्री समसमान असेल, तेव्हा भारत चीन संबंध सुधारतील. भारताने १९६२, २०२० साली मैत्रीचा हात पुढे केला होता. पण त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. आम्ही आज संपूर्ण चीनवर निर्भर आहोत. त्यांनी केलेली घुसखोरी आपण संधी म्हणून घ्यावी. चीन मधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी केंद्र सरकारने तयार करावी. वस्तूनुरुप भारतात त्याची निर्मिती करावी. उद्योजकांना यासाठी मदत करा. चीनच्या वस्तूंची आयात थांबवा. त्यामुळे देशाचा जीडीपी वाढेल, रोजगार निर्माण होतील आणि देशाची अर्थव्यवस्था सुधरेल” असं सुद्धा अरविंद केजरीवाल म्हणाले.