काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावर सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करत राहणार : नाना पटोले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – महाराष्ट्र राज्याच्या नूतन काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार याबाबत अजून स्पष्ट झाले नसून, परंतु प्रदेशाध्यक्षपदी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी एक मोठं विधान केल आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, महाराष्ट्रात स्वबळावर काँग्रेस पक्ष सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करत राहणार आहे, असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यापाठोपाठ राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. या पदासाठी नाना पटोले, काँग्रेस नेते राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांची नावे आघाडीवर आहेत. पण यामध्ये हायकमांडकडून जवळपास नाना पटोले यांचे नाव निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत स्वतः नाना पटोले यांना विचारण्यात आलं असता तेव्हा त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास तत्पर असल्याचं म्हटलं आहे. ते बोलताना म्हणाले, आमच्या पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहे. त्यांच्याकडून जी जबाबदारी मला मिळेल ती प्रमाणिकपणे पार पाडण्याची तयारी माझी असून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. स्वबळावर महाराष्ट्रात पक्ष सत्तेत कसा येईल आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राला पुन्हा वैभव प्राप्त करुन देण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जाईल असे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात असून. मात्र नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, नाना पटोले यांचे नाव निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नूतन अध्यक्ष देखील बदलावा लागणार आहे. त्यामुळे या दोन पदासाठी आता काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याची चर्चा सुरू आहे.