रात्री १० नंतरच फटाके फोडणार, भाजप खासदाराचा न्यायालयाच्या निर्णयाला विरोध 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळी आणि इतर सणांना रात्री केवळ आठ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, भाजपच्या एका खासदाराने न्यायालयाच्या या निर्णयालाच विरोध केला आहे. हिंदू परंपरेत आम्ही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. माझ्या धार्मिक परंपरेचे पालन केल्याने मला तुरुंगात जावे लागले तरी चालेल. दिवाळीत पूजा झाल्यावरच मी फटाके फोडणार. सणासुदीत वेळेची मर्यादा घालता येणार नाही, असा शब्दात भाजपाचे खासदार चिंतामणी मालवीय यांनी सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मध्य प्रदेशमधील भाजपा खासदार चिंतामणी मालवीय यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी दिवाळीचा सण परंपरेनुसारच साजरा करणार आणि लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री १० नंतर मी फटाके फोडणार. हिंदू परंपरेत आम्ही हस्तक्षेप खपवून घेणार नाही. माझ्या धार्मिक परंपरेचे पालन केल्याने मला तुरुंगात जावे लागले तरी चालेल. दरम्यान, मालवीय यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेतही याचा पुनरुच्चार केला आहे. हिंदू सणांमध्ये तुम्ही वेळेची मर्यादा घालू शकत नाही. मोगलांच्या काळातही असे निर्बंध नव्हते. हा निर्णय मला मान्य नाही, असे मालवीय म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर सरसकट बंदी घालण्यास नकार दिला आहे. मात्र, दिवाळी आणि इतर सणांना रात्री केवळ आठ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्यास परवानगी दिली आहे. ध्वनीपातळीचे उल्लंघन करणाऱ्या आणि अन्य प्रतिबंधित फटाक्यांची विक्री होत असल्याचे दिसून आले तर, संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.