CAA : नागरिकत्व दुरूस्ती कायदा राज्यात लागू करणार का ? अजित पवार म्हणतात…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला मंजुरी मिळाल्यापासून अनेक वाद ओढवले आहेत. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास विरोध दर्शविला आहे. या कायद्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहे. या कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयानंतर विचार करू असे ठाकरे सरकारने सांगितले आहे. त्यानंतर आता नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला असून सभागृहात एकच गोंधळ उडाला आहे. त्यानंतर आता, केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा द्यायचा कि नाही, यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सांगितले.

तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी या कायद्यासंदर्भात असलेल्या अधिकारांबाबत चर्चा केली जाणार आहे. पवार यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान ही चर्चा केली जाणार आहे. सोबतच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेसुद्धा नागपुरातच आहेत, त्यामुळे CAB संदर्भातील निर्णय या बैठकीनंतर घेतला जाईल, असेही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. सकाळी विधान भवन परिसरात आयोजित बैठकीत अजित पवार यांनी याबाबत सांगितले.

दरम्यान, सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यात, अधिवेशनात राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या संदर्भात केलेले वसग्रस्त विधान तसेच नागरिकत्व संशोधन विधेयक याशिवाय शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अतिवृष्टी, विकास कामांवरील स्थगिती या मुद्द्यांवरुन विरोधी बाकडावर असणारे भाजप आक्रमक भूमिका घेणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी जरी कमी असला तर ते अधिवेशन वादळी ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/