महाराष्ट्रात ‘कोरोना’ लस मोफत देणार का ? CM ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना लस (corona vaccine) मोफत दिली जाणार का? याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून कोविड लसीकरणाबाबत महत्त्वाच्या सूचना मिळाल्या आहे. त्यानुसार कोरोना काळात लढा देणाऱ्या योद्ध्यांना सर्वात आधी कोरोना लस (corona vaccine)  देण्याचे ठरले आहे. नाहीतर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मीच पहिली लस टोचून घेतली असती. केंद्र सरकारकडून अद्याप लस मोफत देण्याबाबत कोणतीही सूचना आली नाही. लशीची किंमत किती असेल याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. केंद्राने याबद्दल भूमिका स्पष्ट केली तर राज्यात आम्ही पुढचा निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

देशभरात आजपासून (दि. 16) कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील बीकेसी येथील जम्बो लसीकरण केंद्रात पहिल्या कोविड योद्धा व्यक्तीला लस देण्यात आली. यावेळी मुंबईत कोविड काळात संसर्ग झालेल्या रुग्णांची स्वत: चा जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांना पहिल्यांदा कोविशिल्ड लस टोचण्यात आली आहे. यावेळी राज्यात कोरोना लस मोफत दिली जाणार का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री ठाकरे लसीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अजूनही संकट टळलेलं नाही. लस आली तरी काळजी घेतलीच पाहिजे. लस घेतल्यानंतरही मास्क वापरावा लागेलच. काही देशांत हे संकट पुन्हा दुप्पट वेगाने आले आहे. ते आपल्याकडे येऊ नये यासाठी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आज आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. कोरोना लस तयार करण्यासाठी आणखी काही कंपन्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना केंद्राकडून लवकर मान्यता मिळाली तर बाजारात आणखी साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला आणखी बळकट मिळेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.