शरद पवारांनी सांगितलं धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यामागचं कारण, म्हणाले – ‘त्यावेळीच पक्ष कारवाई करेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणानंतर ‘या’ महिलेने आम्हालाही गळ घातल्याची तक्रार भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत दिली. यामुळे प्रकरणाला नवे वळण लागले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना बोलताना आरोपांचे स्वरुप गंभीर असल्याचे म्हटले. मात्र, आता नवीन घडामोडी समोर आल्यावर शरद पवारांनी त्या व्यक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

वार्ताहरांना बोलताना पवार म्हणाले, ‘धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर काल दिवसभरात काही जणांनी आरोप केले. विशेष म्हणजे आरोप करणाऱ्या व्यक्ती विविध पक्षातल्या आहेत. त्यातील एक व्यक्ती मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या पक्षातील आहे. संबंधित महिला ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप मुंडेंसह अन्य जणांनी केले. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. प्रकरणाचा तपास करणाऱ्या समिती मध्ये एखादी एसपी दर्जाची माहिती अधिकारी असावी.’

‘संबंधित महिलेवर तीन व्यक्तींनी अतिशय गंभीर आरोप केले. म्हणून या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. महिलेवरच एकापेक्षा अधिक जणांनी गंभीर आरोप केल्यामुळे कोणावरही कारवाई करणे योग्य ठरणार नाही. ते अन्यायकारक असेल. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण व्हायला हवा. त्यात तथ्य आढळून आल्यास पक्ष योग्य तो निर्णय घेऊन कारवाई करेल,’ असेही शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यामुळे मुंडेंना दिलासा मिळाला आहे.