लॉकडाऊनबाबत CM ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले – ‘सध्याच्या lockdown चा परिणाम पाहूनच पुढील निर्णय घेऊ’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला आहे. पण परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नाही. सध्याच्या लॉकडाऊनचे काय परिणाम दिसतात हे पाहूनच पुढील लॉकडाऊनबाबत काय करायचे ते ठरवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच लसीकरणासाठी निधी आणि तयारी पूर्ण आहे. लस उपलब्ध होताच 18 ते 44 या वयोगटासाठीचे लसीकरण तत्काळ केले जाईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी (दि. 21) रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आरोप करणाऱ्या विरोधकांना उत्तरे देण्यासाठी नाही, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. 4 तासांचा दौरा असला, तरी आपण फोटोसेशनसाठी दौरा काढलेला नाही, असा चिमटाही त्यांनी भाजप नेत्यांना काढला. आपण हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही तर जमिनीवर उतरलो आहोत, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधानांना लगावला आहे. तसेच मी विरोधी पक्षनेता नाही तसेच मी वैफल्यग्रस्त नाही, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे यांनी लगावला. यावेळी फडणवीसही सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. दरम्यान मी विरोधी पक्षासारखे बोलणार नाही, जबाबदारीने बोलणार. पंतप्रधान मोदींनी गुजरात दौरा केला. पण ते महाराष्ट्रात आले नसले तरी ते मदत केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.